नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांची येथील एका न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.सोमवारी रात्री उशिरा भारतींनी द्वारका पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले होते. यानंतर पहाटे ४ च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. भारतींची अग्रिम जामीन याचिका धुडकावून लावत, सर्वोच्च न्यायालयाने भारतींना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. यानंतर रात्री उशिरा भारतींनी द्वारका पोलीस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले होते. मंगळवारी त्यांना द्वारका न्यायालयात हजर करण्यात आले. भारतींच्या प्रकरणाचा पुकारा झाला तरी त्यांचे वकील विजय अग्रवाल न्यायालयात पोहोचले नव्हते. त्यामुळे खुद्द भारती यांनीच स्वत:साठी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद सुरू झाल्याच्या सुमारे १५ मिनिटांनंतर त्यांचे वकील न्यायालयात पोहोचले व त्यांनी भारतींकडील सूत्रे आपल्या हातात घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने भारतींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारती यांना कोठडी
By admin | Published: September 29, 2015 11:14 PM