Bhavana Gawali Shivsena: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ४० आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेला धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) महाविकास आघाडीतून बाहेर पडावे व भाजपसोबत (BJP) सत्तेत यावे अशी बंडखोरांची मागणी होती. पण उद्धव यांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाने भाजपासोबत येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करावी असे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यानंतर शिवसेनेकडून भावना गवळींनाच धक्का देण्यात आला. लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांना हटवण्यात आले असून त्या जागी राजन विचारे (Rajan Vichare) यांची चिफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे शिवसेना अलर्ट मोडमध्ये गेल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली. भावना गवळी या भाजपासोबत जातील अशी भिती शिवसेनेच्या गोटात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी वेळी प्रतोद पदावरील व्यक्तीचा व्हिप सर्व खासदारांना लागू असणार आहे. त्यामुळे, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.
राऊतांच्या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे. आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही बंडखोरी होणार का, याचीच सर्वत्र चर्चा आहे.