लहान वयातच दृष्टी गेली पण स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द भावेश भाटिया यांनी सोडली नाही आणि आज ते ज्य़ा टप्प्यावर आहेत जिथून ते करोडो लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. भावेश यांचे यश हे देखील कठोर संघर्षाचे फळ आहे. त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया. मेणबत्ती व्यावसायिक भावेश भाटिया यांची अवघ्या 23 व्या वर्षी दृष्टी गेली, मात्र त्यांच्या मेहनतीमुळे आज ते 350 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. एवढेच नाही तर आज ते 9 हजार दृष्टीहिन लोकांना रोजगार देत आहे.
भावेश चंदूभाई भाटिया यांना वयाच्या 23 व्या वर्षी रेटिना मस्कुलर डिग्रेडेशन नावाचा आजार झाला, त्यामुळे त्यांची दृष्टी गेली. मात्र त्यानंतर भावेश यांनी एमएचे शिक्षण पूर्ण केलं. पण दृष्टिहीन असल्याने त्यांना नोकरी मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या आईने भावेश यांना सर्वात जास्त धीर दिला. पण भावेश यांच्या आईचेही कॅन्सरने निधन झाले. आई गमावल्यानंतर भावेश निराश झाले. आईच्या प्रेरणेने त्यांनी मेणबत्ती बनवायला शिकण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
मेणबत्त्या बनवण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवल्यानंतर भावेश भाटिया यांनी मित्राकडून 50 रुपयांत गाडी भाड्याने घेऊन मेणबत्त्या विकायला सुरुवात केली. याच दरम्यान भावेश यांची भेट नीता यांच्याशी झाली आणि नंतर त्यांचे लग्न झाले. पत्नी नीता आल्यानंतर भावेश यांच्या आयुष्यात खूप बदल झाला आणि त्यांना आपली हरवलेली दृष्टी मिळाल्यासारखे वाटले. भावेश मेणबत्त्या बनवायचे आणि नीता त्याचं मार्केटिंग करायच्या.
9000 दृष्टीहिन लोकांना रोजगार
1994 मध्ये भावेश भाटिया यांनी सनराईज कँडल कंपनीची स्थापना केली. कंपनी साध्या, सुगंधित, जेल, फ्लोटिंग आणि डिझायनर मेणबत्त्यांसह विविध प्रकारच्या मेणबत्त्या विकते. त्यांच्या मेणबत्त्यांचे जगभरात ग्राहक आहेत. भावेश यांच्या कंपनीत 9000 हून अधिक दृष्टिहीन लोक काम करतात. भावेश यांची पत्नी नीता त्याच्या व्यावसायिक प्रशिक्षणावर देखरेख करतात. व्यावसायिक दिग्गज आनंद महिंद्रा यांनी नुकतेच भावेश भाटियाचे कौतुक केले आणि त्यांची यशोगाथा ट्विटरवर शेअर केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.