हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू आणि भाजपा नेते कुलदीप बिश्नोई यांचे पुत्र आमदार भव्य बिश्नोई यांचा शाही विवाह सोहळा २२ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. भव्य बिश्नोई हे हरियाणामधील आदमपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाआमदार आहेत. त्यांचा शुभविवाह राजस्थानमधील आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांच्याशी होणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी तीन लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. लग्नानंतर नवी दिल्ली, हरियाणामधील आदमपूर आणि राजस्थानमधील पुष्कर येथे रिसेप्शन होणार आहे. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री आणि अनेक व्हीव्हीआयपी सहभागी होऊ शकतात.
माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांनी हिसारमधील आदमपूरमधील ५५ गावांचा दौरा करून लोकांना विवाहासाठी निमंत्रण दिलं आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा माझा विवाह झाला होता, तेव्हा माझ्या वडिलांनी आदमपूर येथील गावांमध्ये जाऊन निमंत्रण दिलं होतं. त्यानुसारच मी आज मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी इथे आलो आहे. आदमपूरचा भाग आमच्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे मी स्वत: गावांमध्ये जाऊन लोकांना लग्नाचं निमंत्रण दिलं. कुलदीप बिश्नोई यांचे मीडिया प्रभारी मोहित शर्मा यांनी सांगितले की, आदमपूर नलवामधील गावामध्ये माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांनी दौरा करून ग्रामस्थांना निमंत्रण दिले.
भव्य बिश्नोई यांचा विवाह २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये होणार आहे. त्यानंतर पहिला रिसेप्शन सोहळा राजस्थानमधील पुष्कर येथे २४ डिसेंबर रोजी होईल. त्यामध्ये ५० हजार लोक उपस्थित राहू शकतात. त्यानंतर आदमपूर विधानसभा मतदारसंघामध्ये २६ डिसेंबर रोजी रिसेप्शन होणार आहे. या कार्यक्रमाला दीड लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर २७ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये रिसेप्शन होणार आहे. त्यात सुमारे ३ हजार व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भाजपा आणदार भव्य बिश्नोई यांचे आजोबा चौधरी भजनलाल यांनी दोन वेळा हरियाणाचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. तसेच ते हरियाणामधून एकदा राज्यसभेवर आणि तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. कुलदीप बिश्नोई यांचं कुटुंब काँग्रेसची संबंधित होते. नंतर त्यांना हरियाणा जनहित काँग्रेस (भजनलाल) स्थापन केली. मात्र काही दिवसांतच ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र नंतर बदललेल्य राजकीय परिस्थितीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते पुन्हा एकदा भाजपामध्ये दाखल झाले होते. दरम्यान, आदमपूर येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भव्य बिश्नोई यांनी भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी केंद्रीय मंत्री जयप्रकार यांना पराभूत करून विजय मिळवला होता.