न्यूयॉर्क - "टाइम" मॅगझिन (TIME magazine)च्या 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत एका भारतीय कार्यकर्त्याने आणि भारतीय वंशाच्या पाच लोकांनी स्थान मिळवले आहे. यात ट्विटरच्या वरिष्ठ वकील विजया गड्डे (Vijaya Gadde) आणि इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा समावेश आहे. बुधवारी जारी झालेले "2021 टाइम 100 नेक्स्ट" जगातील 100 सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या "टाइम 100"च्या श्रृंखलेचा विस्तार आहे. यात भीम आर्मीचे प्रमुख (Bhim Army chief) चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Aazad) यांच्यासह 100 उदयोन्मुख नेत्यांचा समावेश आहे.
"टाइम 100"चे संपादकीय संचालक डॅन मॅकसाई म्हणाले, "या यादीतील प्रत्येक व्यक्ती इतिहास बनविण्यासाठी तयार आहे. खरेतर, यातील काहींनी आधीच इतिहास बनवला आहे." भारतीय वंशाच्या इतर लोकांत, "इंस्टाकार्ट"च्या संस्थापक आणि सीआईओ अपूर्वा मेहता आणि "गेट अस पीपीआय"च्या कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि "अपसोल्व"चे रोहन पवुलुरी यांचा समावेश आहे. तसेच भीम आर्मीचे प्रमुख चंद्र शेखर आझाद यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
टाइममध्ये सुनक यांच्या बाबतीत म्हणण्याता आले आहे, की एक वर्षांपेक्षाही अधिक काळ 40 वर्षीय सुनक ब्रिटिश सरकारमध्ये एक अज्ञात कनिष्ठ मंत्री होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री करण्यात आले. एवढेच नाही, तर ते आता कोविड-19 महामारीत सरकारच्या प्रतिक्रियांचा एक चेहरा झाले. ज्या लोकांना कोरोनामुळे नोकरी गमवावी लागली आहे, त्यांच्यासाठी मदतीच्या उपायांनाही त्यांनी मंजुरी दिली. "यूवगोवच्या सर्वेक्षणानुसार, सुनक हे देशातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आहेत. एवढेच नाही, तर ते इंग्लंडच्या पुढील पंतप्रधान पदासाठी ओडस्मेकची पसंती आहेत," असेही टाइमने म्हटले आहे.