नवी दिल्ली : येथील रविदास मंदिर अनधिकृत असल्याचे सांगत तोडण्याची कारवाई करण्यावरून रामलीला मैदानात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून रामलीला मैदानात आंदोलन सुरू होते. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. याचबरोबर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आहे.
रविदास मंदिर तोडण्याच्या विरोधात रामलीला मैदानात बुधवारी सायंकाळी दलित आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमले होते. हजारो लोकांनी तोडलेल्या मंदिराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दरम्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तुगलकाबाद रोडवर 100 हून अधिक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामलीला मैदानामध्ये सायंकाळी 5 च्या सुमारास जवळपास 8 ते 10 हजार लोक जमा झाले होते. हे लोक मथुरा रोडवरून कालकाजी मंदिर, गोविंदपूरी मेट्रो स्थानकच्या मार्गाने तुगलकाबादच्या टी पॉईंटवर पोहोचले. तेथे पोलिसांना रस्ता अडविला होता. तसेच पाण्याचा मारा करण्यासाठी फायरब्रिगेडच्या गाड्या तैनात केल्या होत्या. पोलिसांनी पुढे न जाण्याचे आवाहन करताच जमावातील काहींनी दगडफेक करण्यास सुरूवात केली.