नवी दिल्ली : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे, असा ठपका सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर ठेवला. दंगल घडविण्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेला अद्याप अटक का केली नाही, असा जाब न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी विचारला.राज्य सरकारने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'एकबोटे आम्हाला सापडलाच नाही,' असा बचाव सरकारी वकिलांनी केली. त्यावर 'आम्ही पोलिसांकडे जायला तयार आहोत. सहकार्यही करू, तेच (पोलीस) आम्हाला बोलावत नाहीत,' असे स्पष्टीकरण एकबोटेच्या वकिलांनी दिले.भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभ वंदन कार्यक्रमास गालबोट लागले होते. शौर्यस्तंभास वंदन करण्यासाठी राज्यातून आलेल्या लोकांवर जमावाने दगफेक केली. २ हजारांच्या जमावाने जमलेल्या लोकांवर अचानक हल्ला केला होता. मोठी दंगल त्यानंतर उसळली होती. एका युवकाचा मृत्यू २ गटांमधील संघर्षात झाल्याने त्यात अजूनच ठिगणी पडली. राज्यभर त्याची प्रतिक्रिया उमटली होती.संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांनीच हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. एकबोटेचा शोध तेव्हापासूनच सुरू आहे. दंगलीच्या दिवशी आपण तिथे नव्हतो, असे स्पष्टीकरण एकबोटेने दिले होते. अटकपूर्व जामिनासाठी एकबोटेची सत्र ते उच्च न्यायालयापासून धावाधाव सुरू आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एकबोटेचा थांगपत्ता लागला नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर मात्र एकबोटे 'मला बोलावत नसल्याची' बतावणी करीत आहे. सरकारने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होईल.- अॅड. निशिकांत कातनेश्वरकर (राज्य सरकारचे वकील).
भीमा कोरेगाव दंगल; मिलिंद एकबोटेला अद्याप अटक का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:48 AM