नवी दिल्ली- भीमा- कोरेगावप्रकरणी राज्यसभेतही आज पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही कौतुक केले. जेव्हा तुम्ही राजकीय भूमिका घेता तेव्हा चर्चेला वेगळे वळण लागते त्यामुळे शरद पवार यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका कौतुकास्पद आहे असे नायडू यांनी सांगितले. काँग्रेसच्या सदस्या रजनी पाटील आणि समाजवादी पक्षाचे नेते नरेश आग्रवाल यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करुन अहवाल मागवावा असे मत मांडले. रजनी पाटील यांनी ज्या नेत्यांची नावे घेतली त्याबाबत कारवाई सुरु आहे, त्यामुळे त्यावर आता फार बोलणे आवश्यक नाही. जे झालं ते झालं आता लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न करुया असे शरद पवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
शरद पवार यांच्यासह नरेश अग्रवाल, डी. राजा, कनिमोझी, संजय राऊत, अमर साबळे, संभाजी राजे छत्रपती, व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले यावेळेस बोलताना म्हणाले, "ही अत्यंत निंदनीय घटना असून याचा सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका सोडून निषेध केला पाहिजे. दरवर्षी दलितांवर हल्ले होण्याच्या 45 हजार घटना घडतात. सर्व सरकारच्या काळामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या सरकारला यासाठी दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी असणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे."
रामदास आठवले यांच्यानंतर राष्ट्रपती नियुक्त सदस्य संभाजी राजे छत्रपती यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. "आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहोत, कृपया मला मराठीतूनही निवेदन करु द्या अशी विनंती करुन त्यांनी आपले मत मांडले. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्ना ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी अठरापगड जाती आणि बहुजन समाजाला एकत्रित भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखावी" अशा आशयाचे निवेदन त्यांनी केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत, राज्य सरकारने अत्यंत संयमाने भूमिका घेतल्याचे सभागृहाला सांगितले. राज्यातील परिस्थिती आणखी बिघडली असती मात्र राज्य सरकारने जे केले ते ठिक केले असे राऊत यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव लढाईच्या मुद्द्यावर काही लोक वारंवार याबाबत हिंदुत्त्ववादी संघटनांकडे बोट दाखवत आहेत पण पेशव्यांचा आरएसएस आणि हिंदू एकता संघटनेशी नव्हता. येथे जे झाले त्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती त्या अदृश्य हातांना शोधण्याचं काम केलं पाहिजे.