नवी दिल्ली: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर आज न्यायालयाकडून निकाल सुनावण्यात येईल. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. या अटकेविरोधात इतिहासकार रोमिला थापर आणि अन्य चार कार्यकर्त्यानी याचिका दाखल केली होती. त्यावर आज निकाल दिला जाईल. याआधी न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत आरोपींना अटक न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सध्या पाचही कार्यकर्ते नजरकैदेत आहेत. जानेवारी महिन्यात कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी हैदराबादमधून सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव, फरिदाबादमधून सुधा भारद्वाज, दिल्लीमधून गौतम नवलखा यांना अटक केली होती. तर ठाण्यातून अरुण फरेरा आणि गोव्यातून वर्नान गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत त्यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. पाच कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात रोमिला थापर यांच्यासह चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी आणि या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. यानंतर न्यायालयानं पाच कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याते आदेश दिले. तेव्हापासून पाचहीजणांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. 'मतभिन्नता लोकशाहीचा सेफ्ट व्हॉल्व आहे. प्रेशर कुकरमध्ये सेफ्ट व्हॉल्व नसल्यावर कुकरचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळेच लोकशाहीत मतभिन्नता असायला हवी,' असं न्यायालयानं पाचजणांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश देताना म्हटलं होतं.