Loksabha Election 2024: मागील वर्षी आम आदमी पक्षात प्रवेश करणारी अभिनेत्री संभावना सेठ हिने आता राजीनामा दिला आहे. तिने 'आप'मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने ही घोषणा केली असून कारणही सांगितले आहे. (Sambhavna Seth Resign From AAP) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूवीर सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली नसली तर सर्व पक्ष आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा करत आहेत. अशातच संभावना सेठचा राजीनामा 'आप'साठी धक्का मानला जात आहे.
राजीनाम्याची घोषणा करताना अभिनेत्रीने म्हटले की, कितीही शहाणपणाने निर्णय घेतला तरीही तुमची चूक होऊ शकते... कारण शेवटी आपण माणसं आहोत. माझी चूक लक्षात आली असून मी अधिकृतपणे 'आप'मधून बाहेर पडण्याची घोषणा करत आहे.
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठने जानेवारी २०२३ मध्ये आम आदमी पक्षाचे सदस्यत्व घेतले. त्यावेळी भावना सेठला आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले होते. पक्षाचे सदस्यत्व घेताना भावना सेठ म्हणाली होती की, मी बऱ्याच दिवसांनी दिल्लीत आली आहे आणि मीडियासमोर आहे. लोक म्हणतात की, मी अभिनयाशिवाय राजकारणावरही बोलेन. हे माझ्या स्वभावात नक्कीच होते, पण मला ते जमणार की नाही हे माहीत नव्हते. राजकारणाची भाषा कशी बोलावे तेच कळत नाही. पण मला काहीतरी चांगले करायचे आहे.
तसेच मी लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मी १२ वर्षांपूर्वी इथे आले होते आणि तेव्हाही मी काही भाषणे दिली होती. मी संजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आम आदमी पार्टी काय काम करत आहे हे कोणाला सांगायची गरज नाही. नुकतेच डोळ्यांचे उपचार मोफत होत असल्याचे मी पाहिले. मोकळेपणाने बोलणे खूप सोपे आहे, परंतु ते करणे खूप कठीण आहे, अशा शब्दांत तिने 'आप'चे कौतुक केले होते. बिग बॉसच्या दोन सीझनमध्ये संभावना सेठचा सहभाग राहिला आहे. ती मूळची दिल्लीची असून तिने ४०० हून अधिक भोजपुरी आणि २५ हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिकांमध्ये काम केले आहे.