नवी दिल्ली - देशात बुधवारी मोठ्या उत्साहात मुस्लीम बांधवांनी ईद साजरी केली. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र मध्यप्रदेशात अनोखे चित्र पाहायला मिळाले. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप खासदार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क शहरातील काजींचे घर गाठले.
खासदार झाल्यानंतर प्रज्ञा ठाकूर प्रथमच मुस्लिमांच्या घरी दाखल झाल्या. ईदनिमित्त प्रज्ञा ठाकूर भोपाळचे शहर काजी मुश्ताक अली नदवी यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी सोबत मिठाईचा डब्बा देखील नेला होता. काजींच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी कुटुंबातील लहान मुलांना मिठाई भरवली. तसेच त्यांच्याशी गप्पा मारल्या.
प्रज्ञा ठाकूर यांनी या भेटीत काजी यांच्या कुटुंबातील महिलांशी २० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीच्या काळात विरोधकांनी आपल्यावर खोटे आरोप केले. ते सर्व आरोप जनतेने फेटाळले. नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' यानुसार आपण ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो आहोत, असही प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त संबोधले होते. त्यानंतर भाजपकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. खुद्द नरेंद्र मोदी यांनी देखील प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याआधी त्यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याविषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते.