भोपाळ- मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारमधील कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् गीत म्हणण्यावर बंदी घातली आहे. कमलनाथ सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्य सचिवालयाबाहेर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काम सुरू करण्याच्या आधी वंदे मातरम् म्हणण्याची पद्धत होती. परंतु काँग्रेस सरकारनं ती पद्धत मोडीत काढली आहे. कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की, वंदे मातरम् म्हणण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामं करण्यावर लक्ष्य केंद्रित करा.कमलनाथ यांच्या या निर्णयावर भाजपानं टीका केली आहे. कमलनाथ सरकारच्या राज्यात कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला भोपाळमध्ये होणाऱ्या वंदे मातरमचं गीत गायन 1 जानेवारी 2019 रोजी झालेलं नाही. परंतु तत्पूर्वीच्या सरकारमध्ये हे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नित्य नियमानं होत होतं. भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या उमा शंकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.गुप्ता म्हणाले, ज्या वंदे मातरमसाठी स्वातंत्र्याचं युद्ध लढण्यात आलं, त्याच्याशी काँग्रेसचं काही देणंघेणं नसून त्यावरूनच त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडतं. सूर्यनमस्काराला जगानं स्वीकारलं आहे, त्यावरही काँग्रेस बंदी घालू पाहत आहे. काँग्रेस समाजात नकारात्मकतेचं विष पसरवत असल्याची टीकाही उमा शंकर यांनी केली आहे.
'वंदे मातरम्' गीत म्हणण्यावर कमलनाथ सरकारची बंदी, भाजपाचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 4:33 PM