भोपाळः कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींवर मात करत अखेर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या 'जंबो कॅबिनेट'चा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी गेल्या आठवड्याभरापासून चर्चा सुरू होती. अखेर त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपामधील त्यांचे समर्थक असलेल्या आमदारांना शिवराज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाकडे समर्थकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी शिंदेंनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यावर चर्चाही सुरू होती. अखेर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेटचा विस्तार केला असून, आता 28 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सकाळी ११ वाजता सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. यात २० कॅबिनेट, तर ८ राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या १० आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. शपथविधीनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'आज (2 जुलै) शपथ घेणार्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. मध्य प्रदेशातील प्रगती, विकास आणि कल्याणची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करू या. मला खात्री आहे की, राज्यात नवनिर्माण करण्यासाठी आपलं पूर्ण सहकार्य आणि योगदान मिळेल.
दिल्लीत काही तासांच्या बैठकीनंतर नवीन मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तबशिवराजसिंह चौहान नुकतेच नवी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी अमित शाह, जेपी नड्डा यांच्या व्यतिरिक्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत घेतलेल्या काही तासांच्या बैठकीनंतर नव्या मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, मध्य प्रदेशचे विद्यमान राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती खालावल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला, जेणेकरून घटनात्मक प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहू शकेल. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराला काहीसा उशीर झाला.