संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:29 AM2024-10-10T11:29:01+5:302024-10-10T11:36:55+5:30
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
Sanjay Raut FIR : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजनेवर दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा युनिटच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने बुधवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त अखिल पटेल यांनी ही माहिती दिली.
पोलिस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महिला मोर्चा जिल्हा युनिटच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांच्या तक्रारीवरून भोपाळ गुन्हे शाखेने बुधवारी संध्याकाळी राऊतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना योजना ही केवळ राजकीय खेळी असल्याने बंद करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. आता या प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भाजपची टीका
राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील माता भगिनींचा सरकारला मिळणारा आशिर्वाद न बघावल्यामुळे शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत हे खोटं बोलण्याचा पराक्रम करत आहेत. मध्य प्रदेशात ही योजना बंद करण्यात आली असे खोटे राऊत यांनी सांगितले. प्रत्यक्षात योजना सुरू आहे. ही अफवा पसरवल्याबद्दल मध्य प्रदेशात संजय राऊत यांच्या विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लढायला काही मुद्दा उरला नाही, की रडायला सुरुवात होते. खोटं बोलून एकदा जिंकता येतं, सारखं नाही. तुमच्या खोटं बोलण्याला आता जनतेने चांगलं ओळखलं आहे. खोटं बोलून विचारधारा विकता येते, निवडणुकही एकदा जिंकता येते; पण लोकांचा विश्वास कधीच नाही मिळवता येत, एवढं लक्षात ठेवा," असा इशारा केशव उपाध्ये यांनी दिला आहे.