भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रचारादरम्यान बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 72 तास अर्थात तीन दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली होती. ही कारवाई आज संपताच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने पुन्हा नोटीस पाठविली आहे.
प्रचारबंदी दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंदिरात जाऊन भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला. याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा नोटीस पाठविली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच, मंदिरातील व्हिडीओ आणि फोटो जमा करण्यास सांगितले आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचारबंदी घातल्यानंतर गेल्या गुरुवारी त्यांनी भोपाळमधील मंदिरांमध्ये पूजा केली होती. तसेच, पूजा-अर्चा केल्यानंतर मंदिरात भजन गायले होते.
भोपाळमधून भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बाबरी मशिदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच त्याबाबत बोलताना आनंद व्यक्त केला होता. या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने 72 तासांची प्रचारबंदी घातली होती. या बंदीनंतर योगी आदित्यानाथ यांनी उत्तर प्रदेशातील मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करुन लोकांच्या भेटी घेतल्या होत्या.