मध्य प्रदेशमध्ये अजब प्रेमाची गजब घटना समोर आली आहे. सरकारी शाळेत शिक्षक असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर पतीला खूप मोठा धक्का बसला. पत्नी आपल्यापासून दूर जाईल ही कल्पनाच सहन झाली नाही. त्याने पत्नी आपल्यापासून कधीच दूर जाऊ नये म्हणून तिचा मृतदेह घरामध्येच पुरण्याचा निर्णय घेतला. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार दास मोगरे असं या व्यक्तीचं नाव असून पत्नी रुक्मिणी यांचं निधन झालं. रुक्मिणी गेल्या अनेक वर्षांपासून सिकल सेल आजाराचा सामना करत होत्या. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ओंकारदास आणि रुक्मिणी यांना अपत्य नाही. रुक्मिणी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि शेजारी जमले. पत्नीला घरातच दफन करा असं मोगरेंनी त्यांना सांगितलं.
नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोगरेंनी ऐकलं नाही. पत्नीशिवाय आपण राहू शकत नाही, असं मोगरे म्हणाले. त्यामुळे नातेवाईकांनी घरातच खड्डा खणला आणि त्यात रुक्मिणी यांचा मृतदेह पुरला. मोगरे यांच्या निर्णयामुळे शेजारी खूप घाबरले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. जिल्हा प्रशासनाचं एक पथक मोगरे यांच्या घरी पोहोचले. मात्र मोगरेंनी त्यांना विरोध केला.
पत्नीला आपल्यापासून दूर नेऊ नका अशी भूमिका ओंकार दास मोगरे यांनी घेतली होती. मोगरे यांच्या निर्णयाने शेजारी घाबरले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यानंतर रुक्मिणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.