नवी दिल्ली - रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशांना सामान्यत: चांगल्या दर्जाचं अन्न आणि पेय मिळतील का, याची काळजी असते. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने खाण्याची व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ रेल्वे स्थानकावर 'ऑन पेमेंट टी' ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना उत्तम चहा देण्याचं काम उच्चशिक्षित मुली करत आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑन-पेमेंट चहा प्रणालीमध्ये मशीनद्वारे चहाचा दर्जा तपासला जातो. विक्रेत्या मुली जो चहा बनवतात, तो या मशीनमध्ये तपासला जातो. चहाचा दर्जा काय आहे, हे मशीन सेन्सरनं केलेल्या चाचणीत सांगतं. सामान्यतः केटरिंगचे मोठे कंत्राटदार मोठी रक्कम जमा करून रेल्वे स्टेशन आणि पॅंट्री कारवर सेवा देतात. मात्र भोपाळमधील फोन ट्रेन टी साठी रेल्वे अधिकाऱ्यांनी एका कंपनीमार्फत या मुलींना काम सोपवलंय.
B.Tech आणि इतर व्यावसायिक पदवी घेणाऱ्या मुली हे काम बिनदिक्कतपणे करत आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे. यापूर्वी रेल्वे स्थानकावर रसायनमिश्रित दूध तयार करून चहा विकण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याचबरोबर इतर शहरांतूनही चांगल्या दर्जाचा चहा मिळत नव्हता. पश्चिम रेल्वेचं हे नवं पाऊल प्रवाशांना उत्तम केटरिंग सेवा देण्यासाठी उल्लेखनीय तर ठरेलच. शिवाय, ते रेल्वे व्यवस्थापनाची प्रतिमा सुधारण्यातही महत्त्वाचं ठरेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.