नियतीनंच 'न्याय' केला, कोर्टातील ड्रायव्हरचा मुलगा 'न्यायाधीश' झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 04:11 PM2019-08-22T16:11:19+5:302019-08-22T16:13:00+5:30
एलएलबी परीक्षेत पदवी प्राप्त केल्यानंतर मी न्यायाधीश प्रवर्गाच्या परीक्षांची तयारी करत होतो.
इंदौर - मध्य प्रदेशातील एका 26 वर्षीय तरुणाने तरुणाईपुढे आदर्श आणि प्रेरणास्थान निर्माण केलं आहे. चेतन बजाड असे या युवकाचे नाव असून या पठ्ठ्यानं न्यायाधीच्या वर्ग क्रमांक 2 ची परीक्षा पास केली आहे. विशेष म्हणजे या मुलाचे वडिल न्यायालयात ड्रायव्हर असून न्यायाधीशांची गाडी चालविण्याचं काम करतात. चेतनने न्यायाधीशाची परीक्षा केल्यानंतर बजाड कुटुंबीयांना अत्यानंद झाला आहे. कारण, बजाड कुटुबीयांचे गेल्या तीन पिढ्यांपासून न्यायालयाशी नातं जुळलेलं आहे. त्यामुळे नियतीनंच न्याय केला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर कोर्टमधील परीक्षा नियंत्रकांनी बुधवारी न्यायाधीशा प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. या उत्तीर्ण यादीत वर्ग क्रमांक 2 च्या परीक्षेत चेतन बजाड(26) याने ओबीसी प्रवर्गातून 26 वी रँक मिळवत न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळवला आहे. यासाठीच्या लेखी आणि तोंडी परीक्षेत मिळून 450 पैकी 257.5 गुण मिळाले आहेत.
माझे वडिले गोवर्धनलाल बजाड हे इंदौर येथील जिल्हा न्यायालयात ड्रायव्हर म्हणून काम करतात. तर, माझे माझे आजोबा हरिराम बजाड हे याच न्यायालयातून चौकीदार म्हणून निवृत्त झाले आहेत. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, त्यांच्या तीन मुलांपैकी एकाने न्यायाधीश व्हावे. अखेर, माझ्या प्रयत्नाने मी त्यांचे स्वप्न सत्यात उतरवू शकलो, असे चेतनने म्हटले आहे.
एलएलबी परीक्षेत पदवी प्राप्त केल्यानंतर मी न्यायाधीश प्रवर्गाच्या परीक्षांची तयारी करत होतो. मात्र, ही परीक्षा पास होण्यासाठी मला सातत्याने प्रयत्न करावे लागले. त्यानंतर, चौथ्या प्रयत्नात मला हे यश मिळाले. सर्वसामान्य कुटुंबातील चेतनचं आयुष्यच या निकालाने बदलून गेलं आहे. परीक्षेतील एका निकालामुळे, भविष्यात कित्येक पीडित, दुखी, कष्टी लोकांचे निकाल देण्याचं, न्यायदानाचं काम करण्याचा अधिकार चेतनला मिळाला आहे. चेतनच्या या यशामुळे त्याच्या परिसरात त्याच कौतुक होत आहे. तर, सोशल मीडियावरही चेतनच्या यशाला मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
न्यायाधीश महोदयांची खुर्ची मिळाल्यानंतर, मी नेहमीच गरीब, पीडित आणि सत्याच्या बाजुने निकाल देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे चेतन बजाड यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.