भोपाळः मध्य प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही खुर्ची जाण्याची भीती सतावते आहे. त्यातच आता कमलनाथ यांनी 10 आमदारांना भाजपानं पैशाचं आमिष दाखवण्याचा आरोप केला आहे. परंतु आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचंही कमलनाथ म्हणाले आहेत. मंगळवारी सर्व मंत्री आणि आमदारांची कमलनाथ यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चाही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मध्य प्रदेशाच्या सरकारमध्ये गोंधळ माजला आहे.तत्पूर्वीच मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जात होता. भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. गोपाल भार्गव म्हणाले होते की, ज्या प्रकारे केंद्र आणि राज्यात भाजपाला जबरदस्त जनाधार मिळालेला आहे. तसेच काँग्रेसचे अनेक आमदार कमलनाथ सरकारला वैतागलेले आहेत. त्यांना भाजपामध्ये प्रवेश हवा आहे. भाजपा काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु काँग्रेसच्या त्या आमदारांना कमलनाथ सरकारबरोबर काम करायचं नाही. त्यामुळे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावं, कारण जनता आता पूर्णतः नाकारत आहे. हे सरकार आपल्या कर्मानं जाणार असल्याचंही भार्गव म्हणाले होते.
काँग्रेसच्या 10 आमदारांना भाजपानं दिली आमिषं, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:34 IST