भोपाळ - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा त्या आपल्या विधानावरून चर्चेत आल्या आहेत. भोपाळमधील व्यापाऱ्यांना त्यांनी भरसभेत चांगलंच सुनावलं आहे. "तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही" अशा शब्दांमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यापाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींच काम असलं तरी तुम्ही सुद्धा यासंदर्भात जागृक राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळमधील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी मंचावर गेल्यानंतर ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. "तुम्ही लोकं आम्हाला मतदान करुन विकत घेत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. तुम्हीही यासंदर्भात जागृक राहण्याची गरज आहे. मात्र असं होताना दिसत नाही. तुम्ही जागृत नसल्यानेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. तुम्ही जागृक नसल्याने विकासकाम होतं नाहीत" असं म्हटलं आहे.
व्यापाऱ्यांना सल्ला देताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तुम्ही जागृक राहणं गरजेचं आहे असं देखील म्हटलं आहे. अशाप्रकारे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना थेट सभेमध्ये सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारे भरसभेमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता. 'काँग्रेसने नऊ वर्षांत केलेल्या छळामुळे मला अनेक जखमा झाल्या, तर अनेक जखमा नव्याने ताज्या झाल्या. या त्रासामुळे माझ्या डोळ्यांना त्रास झाला व मेंदूला सूज देखील आली. माझ्या एका डोळ्याने मला अजिबात दिसत नाही, तर दुसऱ्या डोळ्यानेसुद्धा अंधुक दिसत आहे' असं प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं होतं.