'मला मारण्यासाठी सुपारी देऊन ठेवली आहे', PM नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर मोठा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 12:52 AM2023-04-02T00:52:48+5:302023-04-02T00:54:50+5:30
"भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित आणि ओबीसींसह प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच झाला आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "काही लोकांनी मला मारण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना सुपारी दिली आहे, पण भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित आणि ओबीसींसह प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच झाला आहे. या लोकांनी २०१४ मध्ये मोदीची प्रतिमा मलिन करण्याची शपथ घेतली होती आणि आता त्यांनी शपथ घेतली आहे - 'मोदी तेरी कबर खुदेगी.' राणी कमलापती रेल्वे स्टेशन ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन (नवी दिल्ली) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला मोदींनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ते उपस्थित लोकांना संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, “आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांनी 2014 पासूनच निश्चय केला आहे, ते जाहीरपणेही बोलले आहेत, त्यांनी संकल्प केला आहे की, ते मोदींची छवी खराब करूनच राहतील. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी देऊन ठेवली आहे आणि स्वतःही मोर्चा सांभाळत आहेत. या लोकांना साथ देण्यासाठी काही लोक देशात आहेत, तर काही देशाबाहेर आहेत.’’
‘‘हे लोक सातत्याने मोदीची छबी खराब करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारतातील गरीब, मध्यम वर्ग, आदिवासी, दलित, आदींसह प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच बनले आहे. यामुळेच हे लोक अधिक बिथरले आहेत आणि नवनवीन युक्त्या लढवत असतात.
"मोदी म्हणजे एप्रिल फूल करत असेल"
मोदींनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणात काँग्रेसवरही निशाणा साधला. "जेव्हा या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेल्याची बातमी उद्या छापली जाईल तेव्हा आमचे काँग्रेसचे मित्र १ एप्रिलच्या निमित्तानं असं नक्की म्हणतील की मोदी आहे म्हणजे एप्रिल फूल बनवलं असेल. पण तुम्ही स्वत: आज सगळे पाहात आहात. १ एप्रिल रोजीच ही ट्रेन रवाना होत आहे. हे आपल्या कौशल्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला आधीच निर्माण करण्यात आलेलं रेल्वे नेटवर्क हाती मिळालं होतं. इच्छा असती तर इतक्या वर्षात रेल्वेचा वेगानं विकास होऊ शकला असता. पण राजकीय फायद्यासाठी रेल्वेच्या विकासाचा बळी दिला जात होता. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही उत्तर-पूर्व भागात रेल्वेचं नेटवर्क नाही. २०१४ साली जेव्हा मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हाच मी ठरवलं होतं की आता असं चालणार नाही. रेल्वेचा कायापालट झालाच पाहिजे. गेल्या ९ वर्षात आम्ही सातत्यानं त्यादृष्टीनं काम केलं आहे आणि भारताच्या रेल्वे नेटवर्कला जगातील सर्वश्रेष्ठ नेटवर्क कसं बनवता येईल यादृष्टीनं आम्ही काम करत आहोत, असंही मोदी म्हणाले.