भोपाळ : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संशयित पत्र मिळाले आहे. संशयित पत्र उर्दू भाषेत लिहिले आहे. पत्रासोबत पावडर सुद्धा मिळाली आहे. फॉरेन्सिक टीम प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी करत आहे.
उर्दू भाषेत असलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोंवर क्रॉसचे चिन्ह आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या स्टाफने पत्र मिळाल्यानंतर पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर पत्र फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. या टीमने पावडर आणि उर्दू भाषेत लिहिलेले पत्र तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे.
संशयित पत्र मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले की, हे दहशतवाद्यांचे कृत्य असल्याची शक्यता आहे. मात्र अशा घटनांना मी घाबरणार नाही. पत्र उर्दूमध्ये लिहिले आहे. यासोबत आणखी काही पत्र सुद्धा जोडले होते. मला याआधीही अशाप्रकरचे पत्र मिळाले आहे. पोलिसांना याबाबत सांगितले होते. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.