Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा धक्काच बसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना समजून न घेणं हे भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश असल्याचं उमा भारती म्हणाल्या आहेत.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाचे नेते मोदींवर जोरदार टीका करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र मोदींनी योग्य विचार करुन पाऊल टाकल्याचं म्हणत आहेत.
"मी गेल्या चार दिवसांपासून वाराणसीत गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा मी अवाक् झाले होते. त्यामुळेच आज तीन दिवसांनंतर मी माझी प्रतिक्रिया देत आहे. कृषी कायदे मागे घेताना मोदींनी जी प्रतिक्रिया दिल्या त्यानं मी खूप व्यथित झाले आहे. कृषी कायद्यांचं महत्त्व जर मोदी शेतकऱ्यांना समजावू शकले नसले तर हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं अपयश आहे. आम्ही शेतकऱ्यांशी संवाद आणि संपर्क का करू शकलो नाही", असं उमा भारती म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी हे अतिशय विचारपूर्वक आणि समस्येच्या मूळाशी जाऊन निर्णय घेणारे नेते आहेत. जो समस्येचं मूळ समजून घेतो तोच व्यक्ती समस्येचं समाधान शोधून काढू शकतो. देशाची जनता आणि पंतप्रधान मोदींचा एकमेकांशी समन्वय, जागतिक राजकारण हे सारं ऐतिहासिक आहे. कृषी कायद्यांबाबत विरोधकांच्या अपप्रचाराचा सामना आम्ही करू शकलो नाही. त्यामुळेच मी पंतप्रधानांच्या त्या भाषणानंतर मी खूप व्यथित झाले होते, असं उमा भारती म्हणाल्या.
खरंतर कृषी कायदे मागे घेऊनही पंतप्रधान मोदींनी आपलं महानता दाखवून दिली आहे. आपल्या देशात असा अनोखा नेता सैदव यशस्वी राहिला पाहिजे अशी बाबा विश्वनाथ आणि माँ गंगे चरणी प्रार्थना करते, असंही उमा भारती शेवटी म्हणाल्या.