नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,45,26,609 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,75,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी (17 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,26,71,220 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान कोरोनातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली. याप्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. लोकांनी मृत्यू झालेला व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नियम पाळण्यात आलेले नसल्याचं देखील सांगितलं आहे. ती व्यक्ती खरंच पॉझिटिव्ह होती का याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भोपाळमध्ये कोरोनामुळे वाईट परिस्थिती आहे. अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. सूरतमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येतात. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सूरतमध्ये आहे.
कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला. त्यामुळे चार दिवसांत एकाच घरातून तीन अंत्ययात्रा निघाल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्ये एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.