भोरचे आमदार संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:51 AM2021-06-30T05:51:55+5:302021-06-30T05:52:24+5:30
काँग्रेस नेतृत्वाकडून विचार सुरू
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेतृत्व पुण्याचे भोर येथील पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षातील नेते महाआघाडीत सामील असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतरच थोपटे यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या निर्णय तात्काळ घेतला जावा यासाठी सोनिया गांधी अनुकूल नव्हत्या.
अधिवेशन केवळ दोन दिवसांचे असल्याने विधानसभा अध्यक्ष निवडीसारखा महत्त्वाचा निर्णय इतक्या घाईघाईत घेणे योग्य ठरणार नाही, असे सोनिया गांधी यांनी प्रभारी एच. के. पाटील यांना सांगितल्याचे समजते.
चर्चेतील आमदार
४१ वर्षांचे संग्राम थोपटे हे चर्चेतील आमदार आहेत. २२ मार्च २०१७ रोजी राज्यातील तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रतींचे विधानभवनाबाहेर दहन केल्याबद्दल थोपटे यांच्यासह १८ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.