ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ४ - हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशात दलित विद्यार्थ्यांवर होणा-या अन्यायाचा मुद्दा केंद्रस्थानी आलेला असतानाच बिहार सरकारने दलित विद्यार्थ्यांबद्दल दाखवलेले असंवेदनशीलतेचे एक प्रकरण समोर आले आहे.
बिहार सरकारकडून वेळेवर विद्यावेतन न मिळाल्यामुळे बिहारच्या ६० दलित विद्यार्थ्यांना भुवनेश्वरमधील राजधानी अभियांत्रिकी महाविद्यालय सोडण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे. वारंवार विनंती करुनही बिहार सरकारने वेळेवर विद्या वेतन न दिल्यामुळे आठ जानेवारीला या विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि वसतिगृह सोडावे लागले.
हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या दुस-यावर्षाला शिकत आहे. सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही तर, आयुष्य संपवण्याची धमकी या विद्यार्थ्यांनी दिली आहे. बिहारच्या पूर्व चंपारणमधील १८ आणि पश्चिम चंपारणधील ४२ विद्यार्थी आहेत.
दोनवर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांनी बिहार सरकारच्या दलित विद्यावेतन योजनेतंर्गत भुवनेश्वरच्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. बिहार सरकारने या विद्यार्थ्यांचे दीडवर्षापूर्वी शेवटचे विद्यावेतन कॉलेजकडे जमा केले होते.