'नवीन संसद भवनाचे भूमिपूजन म्हणजे अंत्यसंस्कारावेळी Dj वाजवणं होय'
By महेश गलांडे | Published: December 11, 2020 08:54 AM2020-12-11T08:54:44+5:302020-12-11T08:56:28+5:30
काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका करताना स्वदेशी आणि विदेशीचा मुद्दा पुढे आणला आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन झाले. दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नवे संसद भवन ज्या प्रकल्पांतर्गत उभारले जाणार आहे, त्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर सुनावणी करताना केंद्र सरकारला तूर्तास केवळ भूमिपूजनासाठीच परवानगी दिली. या इमारतीविरोधात काही याचिकाही दाखल झाल्या आहेत. तर, काँग्रेसनेही या प्रकल्पावरुन केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. तसेच, सोशल मीडियावरही नवीन संसद भवनच्या इमारतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका करताना स्वदेशी आणि विदेशीचा मुद्दा पुढे आणला आहे. तसेच, नवीन संसद भवन उभारणे म्हणजे अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात डिजे वाजविण्यासारखे आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने नेते आणि माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी नवीन संसद भवनच्या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका केली आहे. जुन्या संसद भवनचा आकार मध्य प्रदेशातील चौसठ योगिनी मंदिरासारखा आहे, तर नवीन इमारतीचा आकार अमेरिका सरकारच्या संरक्षण विभागाची इमारत पेंटागनसारखा असल्याचे सांगितले. रमेश यांच्या या ट्विटवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
Well, the existing Parliament building built by the Brits bears a remarkable similarity to the Chausath Yogini Temple in Morena in Madhya Pradesh, while the new ‘atmanirbhar’ Parliament building bears an eerie likeness to the Pentagon in Washington DC. pic.twitter.com/Hy2u6fzlms
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 10, 2020
काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्विट करुन संसदेच्या नवीन इमारतीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलंय. नवीन इमारतीचं भूमीपूजन करण्याचा निर्णय ह्रदयद्रावक आणि संवेदनाहीन आहे. देश सध्या आर्थिक मंदीतून जात असताना भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात येत आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात डिजे वाजविण्यासारखे आहे, असे शेरगील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकल्पासंदर्भात काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यात सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या इमारतींचे पाडकाम, झाडांची तोडणी यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. यासंदर्भात आधी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करावे मगच प्रकल्पाच्या बांधकामाला हात घालावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
प्रकल्पाची गरज का भासली?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा घेतलेला आढावा..
सद्य:स्थितीतील संसद भवन तसेच विविध सरकारी खात्यांची कार्यालये, मंत्र्यांची दालने, मंत्रालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांची निवासस्थाने हे सर्व अपुरे पडत आहे
या सगळ्याचे बांधकाम १९२७ मध्ये एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर या ब्रिटिश स्थापत्यकारांनी केले आहे. त्यामुळे या परिसराला ल्युटेन्स दिल्ली असे संबोधले जाते
काळानुरूप सध्याची बांधकामे जीर्ण आणि अपुरी आहेत. त्यामुळे नव्या संसद भवनासह संपूर्ण परिसराचे नव्याने बांधकाम करण्याचे ठरले
५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली
नवीन काय?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत सध्याचे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक यांचे रूपांतर संग्रहालयात केले जाईल.
उपराष्ट्रपतींचे सध्याचे निवासस्थान पाडले जाईल.
नवीन संसद भवनात भव्य असा कॉन्स्टिट्यूशन हॉल (राज्यघटना सभागृह) उभारला जाईल.
कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटनेची मूळ प्रत ठेवली जाईल.
संसद भवनाच्या आवारात सर्व मंत्र्यांची नवीन कार्यालये असतील.
पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची
निवासस्थाने असतील.
काळाची गरज लक्षात घेऊन लोकसभेत
८८८ तर राज्यसभेत
३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल.
डिजिटली अद्ययावत
असेल नवीन संसद भवन.
नवीन संसद भवन भूकंपरोधक असेल.