त्रिजुगी नारायण तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : राम मंदिर भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २२.६ किलो चांदीची वीट ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.
फैजाबादचे भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी याबाबत टष्ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांनी या विटेचे छायाचित्र शेअर करुन सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे. चांदीच्या या विटेचे वजन २२ किलो ६०० ग्रामआहे. भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीला रत्नजडीत पोषाख परिधान करण्यात येणार आहे. या पोषाखात ९ प्रकारचे रत्न असणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, मंदिराखाली टाइम कॅप्सूल ठेवणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र आता, महासचिव चंपत राय यांनी टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार नाही, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येची विकास योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. राम मंदिर ते बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, विमानतळाला रुंद रस्त्याने जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सहादतगंंज बायपास ते नवा घाटपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल. यावर २१० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. अयोध्या ते सुल्तानपूर रोडवर बनविण्यात येत असलेल्या विमानतळाला जोडण्यासाठी दीड किमी चार पदरी रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे.अयोध्येत चारही बाजूंनी रिंग रोडअयोध्येत चारही बाजूंनी रिंग रोड बनविण्यात येणार आहे. यामुळे अयोध्येत येणाऱ्या भाविकांना सहजपणे येता येईल. अयोध्येच्या परिसरातील सात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. अयोध्येतील विविध रस्ते रुंद करण्यात येणार आहेत. निवासाची व्यवस्था करण्यासाठी निवास विकास परिषदेकडून ६०० एकरमध्ये नवी अयोध्या वसविण्याचा प्रयत्न आहे.अयोध्येतील प्रमुख स्थाने हनुमान गढी, दशरथ महाल, कनक भवन, जानकी मंदिर, दिगंबर आखाडा, राजद्वार येथे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.अयोध्येतील प्रमुख ठिकाणी भगवान रामांचे चित्र काढण्यात येत आहेत. पूर्ण अयोध्येत सध्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीची लगबग दिसून येत आहे.