पुणे : अयोध्येतील राममंदिर हा फक्त मंदिर आणि एका वास्तूचा प्रश्न नाही तर स्वाभिमानाचा विषय आहे. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत देशातील लोकांचे मनोबल वाढले पाहिजे आणि राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे देशातील लोकांचं मनोबल नक्कीच वाढणार आहे. या मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.हा भूमिपूजनाचा निर्णय राष्ट्राचा मनोबल वाढवणारा आहे. कोरोनाशी दोन हात करताना औषधासह हा महत्वाचा उपाय ठरणार आहे, असे मत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गोविंदगिरी महाराज म्हणाले, संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय. १६१ फूट उंच, २ मजले मंदिर व त्यावर शिखर असे मंदिराचे स्वरुप असणार आहे. आरंभापासून तीन ते साडे तीन वर्षी राम मंदिर उभारणीला लागतील. नवीन राममंदिर स्वरूप बदललं आहे त्यामुळे तीन वर्षे लागणार आहे. सर्व भारतीय परंपरेनेच होईल.निर्मिती प्रक्रियेत १०८ एकर जमीन असेल,त्यात काही दान म्हणून येईल,काही विकत घ्यावी लागेल. यापैकी आठ एकरात मंदिर निर्माण होणार आहे. तत सर्व देशाचं प्रतिबिंब दिसले पाहिजे असे साकारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे मंदिर २ एकरामध्ये असणार आहे. येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. गुजरातमधील सोमपुरा परिवाराकडून हे बांधण्यात येणार आहे. निमंत्रण कुणाला द्यायचं, नाही द्यायचं याची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे.
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर हे सगळे हेलिकॉप्टरने येतील. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरत्या स्थळी आली तर त्यांची व्यवस्था करणे शक्य होणार नाही..पण तरीही ज्यांना यायचं असेल त्यांचं स्वागत असेल असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले.