वाराणसी - स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलं. इतकंच नाही तर त्यांनी काहीकाळ श्रमदानही केलं. वाराणसी दौ-यातील शेवटच्या दिवशी शहंशाहपूर गावात स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी स्वत: शौचालयासाठी विटा रचल्या. पशुधन आणि आरोग्य मेळाव्याचं उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहंशाहपूरमध्ये आले होते. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले. पशुधन आरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, 'शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली आहे तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला हे फार आवडले. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील'. शौचालयांना ‘लज्जा रक्षणाचं घरं’ असं नाव दिलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वच्छता माझ्यासाठी पूजा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसंदर्भात बोलताना म्हटले की, अस्वच्छता आजार वाढवण्याचं काम करते. आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. स्वच्छता माझ्यासाठी पूजा आहे. स्वच्छता राखणं संपूर्ण देशाची जबाबादारी आहे. सफाईसाठी जेवढं काम होणं अपेक्षित होतं तेवढं झालेले नाही. घाण आपण करायची आणि साफसफाई कुणी दुस-या व्यक्तीनं करायची, ही मानसिकता चालणार नाही.
व्होट बँकसाठी कामं नाही करत विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी असे म्हणाले की, भाजपासाठी व्होटबँकेच्या राजकारणापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. आतापर्यंत पशूधनासाठी काम करण्यात आलेले नव्हते. पशुपालन आणि दूध उत्पादनामुळे नवीन आर्थिक क्रांतीचा जन्म होईल. देशात आजही अनेकांकडे हक्काचे घर नाही. अशा लोकांना 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
जनतेच्या पैशांचा वापर जनतेसाठीच होणार जनतेच्या पैशांचा वापर जनतेच्या भल्यासाठीच होणार. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात आम्ही काम करत आहोत आणि या कामात चांगल्या गतीनं पुढे जात आहोत. आम्ही प्रामाणिकपणे हे अभियान चालवलं आहे आणि जीएसटीदेखील या अभियानाचा एक भाग आहे.