अहमदाबाद-
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं ऐतिहासिक यश प्राप्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाचंही नाव निश्चित झालं आहे. भूपेंद्र पटेल हेच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत. भाजपा आमदारांच्या बैठकीत आज भूपेंद्र पटेल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. भाजपा आमदार हर्ष संघवी यांनी प्रसार माध्यमांना याबाबतची माहिती दिली आहे. गुजरात भाजपा आमदारांच्या दलानं भूपेंद्र पटेल यांची सर्वानुमते विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. आज सर्व आमदारांची बैठक झाली यात निर्णय घेण्यात आला, असं संघवी म्हणाले. गुजरात भाजपाच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली.
UCC बाबत भूपेंद्र पटेल यांचं सूचक विधाननवं सरकार UCC बाबत पहिल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेणार की नाही याबाबत विचारलं असता भूपेंद्र पटेल यांनी समितीची स्थापन करण्यात आलेली आहे. समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असं विधान केलं आहे.
भाजपा आमदारांच्या आजच्या बैठकीला केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून राजनाथ सिंह, बीएस येडियुरप्पा आणि अर्जुन मुंडा देखील उपस्थित होते. नव्या नेत्याची निवड ही केवळ औपचारिकता होती. कारण पक्षाकडून याआधीच घोषणा करण्यात आली होती. अहमदाबादच्या घाटलोढिया मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा भूपेंद्र पटेल १.९२ मतांनी निवडून आले आहेत. पटेल यांनी गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
नव्या सरकारचा शपथविधी १२ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपाचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपानं यंदा गुजरातमध्ये एकूण १८२ जागांपैकी तब्बल १५६ जागांवर यश प्राप्त करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री राहतील हे याआधीच स्पष्ट केलं होतं. तसंच नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी गांधीनगरच्या हॅलीपॅड ग्राऊंडमध्ये होणार आहे.