रायपूर : भाजपकडून सत्ता खेचून आणत काँग्रसचे भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, बघेल यांना नाईलाजाने हिंदीतूनच शपथ घ्यावी लागली. खरे म्हणजे त्यांना छत्तीसगडी भाषेतून शपथ घ्यायची होती. तसे त्यांनी राज भवनाला कळविलेही होते. मात्र, संविधानिक पेचामुळे राज्यपालांनी त्यांना परवानगी नाकारली.
शपथविधीच्या काही तास आधी राज्यपाल भवनातून बघेल यांना फोन करण्यात आला. छत्तीसगडी भाषेची नोंद सूचीत नसल्याने या भाषेतून शपथ घेऊ शकणार नसल्याचे कारण त्यांना सांगण्यात आला.
छत्तीगडचे नवे मुख्यमंत्री बघेल यांचा शपथविधी पावसामुळे इनडोअर स्टेडिअममध्ये घेण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षांसह सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. भूपेश यांना छत्तीसगडी भाषेतून शपथ घ्यायची होती. यासाठी त्यांनी राजभवनावर फोनही केला होता. काही वेळाने राजभवनातून फोन करून अशक्य असल्याचे सांगण्यात आले. संविधानाच्या 8 व्या अनुसुचीमध्ये नोंद असलेल्या भाषांमध्ये छत्तीसगडी भाषाच नसल्याचे स्पष्ट केले. 8 व्या अनुसुचीमध्ये 22 भाषाच शपथग्रहणासाठी दिलेल्या आहेत. छत्तीसगडी भाषेला अद्याप राजभाषेचा दर्जा मिळालेला नसल्याने बघेल यांना हिंदीतूनच शपथ घ्यावी लागली.