नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्या. भूषण गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए. एस. बोपन्ना या चार नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. या न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पाठविलेला प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर याची अधिसूचना जारी करण्यात आली.
सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता २७ वरून ३१ वर पोहोचली आहे. न्या. भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असून, न्या. सूर्यकांत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे, न्या. बोस झारखंडचे तर, न्या. बोपन्ना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांच्या कॉलेजियमने ही शिफारस केली होती. न्या. बोस हे ज्येष्ठतेनुसार बाराव्या, तर न्या. बोपन्ना ३६ व्या क्रमांकावर आहेत. न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या नावांची शिफारस यापूर्वीही केंद्र सरकारने केली. मात्र ज्येष्ठतेच्या आधारावर केंद्र सरकारने ही शिफारस फेटाळून लावली होती. त्यानंतर कॉलेजियमने पुन्हा दोन्ही नावांची शिफारस केली व त्यांची ज्येष्ठता, पात्रता आणि निष्ठेबाबत कुठेही प्रश्न उपस्थित होत नसल्याचा शेराही दिला. तसेच न्या. गवई व न्या. सूर्यकांत यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती.