Odisha Tragedy : ओडिशात २ जून रोजी झालेला रेल्वेअपघात म्हणजे एक वाईट स्वप्नच. या भीषण अपघाताने अनेकांना पोरकं केलं, काहींनी आपले नातेवाईक गमावले, कोण अनाथ झाला तर कोणाच्या डोक्यावरचं 'बाप' नावाचं छत्र हरपलं. २९० जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर अद्याप ८१ मृतदेहांची ओळख पटली नसल्याची धक्कादायक माहिती स्थानिक महापौरांनी दिली आहे. तसेच हे मृतदेह एम्स रूग्णालयात ठेवण्यात आले असल्याचे भुवनेश्वर महानगरपालिकेच्या महापौर सुलोचना दास यांनी सांगितले.
स्थानिक महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा रेल्वे अपघातातील ८१ मृतदेह एम्समध्ये ठेवण्यात आले आहेत. अनेकांनी एकाच मृतदेहावर दावा ठोकल्यामुळे प्रशानसनाला अडचणी येत आहेत. त्यांना डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. नमुने दिल्लीला पाठवण्यात आले असून २१ जणांची पुष्टी झाली आहे. मृतदेह घेण्यासाठी ५ कुटुंबे आली आहेत. सरकारी आदेशानुसार, अंत्यसंस्कारासाठी कोणतीही अडचण नसल्यास पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल. मृतदेह त्यांच्या मूळ भागात हलवण्याची गरज आहे. यासाठी आम्ही गाड्यांची व्यवस्था केली आहे. ज्या मृतदेहांवर कोणीही दावा केला नाही, त्यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जातील. त्यासाठी आम्ही दोन स्मशानभूमींची व्यवस्था केली आहे.
२९० जण दगावले २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.