सरवडे : बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यास गळितास आलेल्या उसाला एफ.आर. पी.प्रमाणे दर देण्यास बांधील आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. बिद्री साखर कारखान्याच्या ५३ व्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर प्रदीपन समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष पाटील व त्यांच्या पत्नी मायादेवी पाटील या उभयंतांच्या हस्ते होमहवन व सत्यनारायण पूजा होऊन बॉयलर प्रदीपन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, एफ.आर.पी.प्रमाणे दर देणे कायद्याने बंधनकारक आहे. ‘बिद्री’ने गेल्या दहा वर्षांत कायमपणे एफ. आर. पी.पेक्षा अधिक दर दिला आहे. मागील हंगामात साखर दराच्या घसरणीमुळे शेवटच्या महिन्यात आलेल्या उसाला वेळेत एफ. आर. पी. प्रमाणे रक्कम देता आली नाही. गेली दहा वर्षे या कारखान्यात सभासदांचे विश्वस्त म्हणून काम करत असताना सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही काम आमचेकडून झालेले नाही व यापुढे होणार नाही. ते म्हणाले, सध्या साखरेचे दर सुधारू लागले आहेत. केंद्र शासनाने प्रत्येक कारखान्याच्या उत्पादनातील १२ टक्के अशी देशातील ४० लाख मे. टन साखर निर्यात करणे सक्तीचे केल्यामुळे पुढील हंगामात साखरेचे दर टिकून राहतील. साखरेचे दर असेच राहिल्यास एफ.आर.पी.प्रमाणे दर देण्यास अडचण येणार नाही. ते म्हणाले, या वर्षापासून लागण नोंदीत सुसूत्रता येण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर संगणकीकृत लागण नोंदी होणार आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यास त्याचा वापर सर्व कार्यक्षेत्रात करण्याचे नियोजन आहे. संचालक ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे, नामदेवराव भोईटे, डी. एस. पाटील, दत्तात्रय खराडे, गणपतराव फराकटे, वसंतराव पाटील, पंडितराव केणे, के. जी. नांदेकर, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, जीवन पाटील, नेताजी पाटील, सुनील कांबळे, सविता एकल, कमल चौगले, विलास झोरे, भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, ‘गोकुळ’चे संचालक विलासराव कांबळे, बाजार समितीचे संचालक उदयसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुंभार, विश्वनाथ कुंभार, तालुका संघाचे संचालक कृष्णात फराकटे, निवासराव देसाई उपस्थित होते. कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
‘बिद्री’ ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास बांधील
By admin | Published: October 15, 2015 11:35 PM