दोन दिवसांपूर्वी रशियाने अँटी सॅटेलाईट मिसाईलने आपलाच उपग्रह उडवत चाचणी घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर त्याचे अवशेष आदळण्याचा धोका टळलेला असताना आता आणखी एक मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यातील ही घटना आहे. इस्त्रोने मोठ्या प्रयत्नांनी चांद्रयान- २ वाचविले आहे.
इस्त्रोने याची माहिती दिली आहे. चांद्रयान-२ आणि नासाचा उपग्रह लूनर रिकोनिसेंस ऑर्बिटर (LRO) हे एकमेकांवर आदळणार होते. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते. एकाच वेळी एकमेकांच्या मार्गातून जाणार होते. परंतू इस्त्रोने चांद्रयानच्या ध्रवीय कक्षेत बदल केला आणि चांद्रयानचा वेग कमी केला. यामुळे ही टक्कर वाचली आहे.
चांद्रयान २ ऑर्बिटर आणि एलआरओमध्ये जवळपास 100 मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. दोन्ही उपग्रह एकमेकांच्या जवळ येण्याआधी एक आठवडा इस्त्रो आणि नासाच्या ही बाब लक्षात आली. हा अपघात टाळण्यासाठी collision avoidance manoeuvre (CAM) ची गरज होती. चांद्रयान-2 आणि एलआरओ दोन्ही उपग्रह चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत परिक्रमण करतात, यामुळे दोन्ही उपग्रह चंद्राच्या ध्रुवांवर एकमेकांच्या जवळ येतात. अशी वेळ आलीच तर इस्त्रो आपल्या कक्षेत लगेचच बदल करून अपघाताची शक्यता टाळते. ही अशी पहिलीच वेळ इस्त्रोवर आली आहे. हा खूप चांगला अनुभव होता असे इस्त्रोने म्हटले आहे.