डेहराडून:उत्तराखंडच्या रामनगर येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. येथील ढेला नदीत पर्यटकांची कार वाहून गेली. या अपघातात 9 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने एका मुलीचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. अपघातातील सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पंजाबचे होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसानंतर ढेला नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. हे पाणी पुलाच्या वरपर्यंत चढले होते. यादरम्यान तेथून जाणाऱ्या पर्यटकांनी भर पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी पुलावरुन नदीत कोसळली आणि नदीच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेली.
पंजाबचे 11 पर्यटक अर्टिगा कारमधून उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आले होते. दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांची गाडी रामनगर येथील ढेली नदीजवळ आली. नदीचे पाणी पुलावरून वाहत होते. असे असतानाही चालकाने वाहनाचा वेग वाढवला आणि भरधाव वेगात पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा जोर इतका होता की कार नदीत वाहून गेली. अपघातानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळापासून काही अंतरावर 9 जणांचे मृतदेह आढळून आले.