झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील डुमरी ब्लॉकमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. लग्न आटोपून परतणाऱ्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी भरलेल्या पिकअपला मोठा अपघात झाला. या घटनेत नववधूच्या पालकांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात 28 जण जखमीही झाले असून त्यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅनमध्ये 45-55 जण होते. डुमरीच्या सारंगडीह येथे आपल्या मुलीचे लग्न लावून सर्वजण कटारीला घरी परतत होते. दरम्यान, झरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरडा गावाजवळ अचानक एक अनियंत्रित पिकअप व्हॅन तीन वेळा उलटली, यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरुवातीला सर्व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र चैनपूर येथे आणण्यात आले, तेथून सर्वांना रुग्णालयात रेफर करण्यात आले. रुग्णालयातून तिघांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना रिम्समध्ये पाठवण्यात आले. या अपघातात मुलीची आई लुंदरी देवी (45), वडील सुंदर गयार (50), सविता देवी (35), पुली कार किंडो (50) आणि अलसू नागेसिया (30) यांचा जागीच मृत्यू झाला
अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर पोलीस ठाण्याने सर्व जखमींना उपचारासाठी चैनपूर उपआरोग्य केंद्रात पाठवले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय गुमलाचे उपअधीक्षक रुग्णालयाच्या मुख्य गेटवर दोन ते तीन तास जखमी पोहोचण्याची वाट पाहत बसून राहिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"