नवी दिल्ली : डीएचएफएल - येस बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या आठ ठिकाणांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या प्रकरणी सीबीआय शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्या परिसराची झडती घेत आहे. या छाप्यादरम्यान त्यांच्या ठिकाणाहून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, अलीकडेच सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियालाही अटक केली होती
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विनोद गोयंका यांच्या घरावर छापे टाकण्यात आले असतानाच दुसरीकडे मुंबईतील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांची झडती घेतली आहे. संजय छाब्रियाच्या अटकेनंतर सीबीआयने याप्रकरणी आपली कारवाई तीव्र केली आहे.
राणा कपूर चर्चेतयेस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर अलीकडेच खूप चर्चेत होते. ईडीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडून एमएफ हुसेन यांचे पेंटिंग विकत घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्क येथे वापरली होती. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले होते की, एम एफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांना गांधी कुटुंबाशी नाते निर्माण करण्यात अडचण येईल. शिवाय त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार देखील मिळणार नाही, असेही राणा कपूर यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
2018 मध्ये सुरू झाले प्रकरणविशेष म्हणजे, फसवणुकीचे हे प्रकरण एप्रिल ते जून 2018 दरम्यान सुरू झाले, जेव्हा येस बँकेने डीएचएफएलच्या अल्प-मुदतीच्या डिबेंचरमध्ये 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या बदल्यात वाधवांनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना डीओआयटी अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज म्हणून 600 कोटी रुपये दिले.