महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा निधी रोखल्यानंतर निवडणूक आयोगाने झारखंडकडे आपला मोर्चा वळविला आहे. तेथील पोलीस महासंचालकांना पदावरून हटविण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या निवडणुकीत पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुप्ता यांना तात्काळ हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. गुप्ता यांना हटविण्यामागे त्यांच्या इतिहास तक्रारींचा असल्याचा हवाला देण्यात आला आहे.
गुप्ता यांना हटविल्यानंतर राज्य सरकारला अहवालही सादर करण्यास सांगितला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी गुप्ता यांच्यावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप झामुमोकडून करण्यात आला होता. यानंतर त्यांना झारखंडच्या एडीजी (विशेष शाखा) पदावरून कर्तव्यमुक्त करण्यात आले होते. यानंतर त्यांना दिल्लीला पाठविण्यात आले होते. तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर राज्यात परतण्यावर बंदी आणण्यात आली होती.
२०१६ मध्येही गुप्ता यांच्यावर राज्यसभा निवडणुकीत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने चौकशीनंतर त्यांच्याविरोधात चार्जशीट जारी केली होती. यानंतर त्यांच्यावर विभागीय चौकशी लावण्यात आली होती. हा सर्व इतिहास पाहता यावेळी निवडणूक आयोगाने गुप्ता यांच्यावर ही कारवाई केली आहे.