संजय शर्मा -
नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेस व आम आदमी पार्टी (आप) यांची युती झाली असली तरी प्रत्यक्षात युतीचा कुठेही मागमूस दिसत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करणे तर दूरच, त्यांचे पोस्टर्सही लावण्यात आले नव्हते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची हीच स्थिती असून, ही दुफळी भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांसाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निवडणूक रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांची एक निवडणूक सभा अजून व्हायची आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक सभा झाली. आता प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा होणार आहेत. दिल्लीत भाजपने यावेळी सातपैकी सहा जागांवरील आपले उमेदवार बदलले आहेत.
निवडणुकीत कोणताही राष्ट्रीय मुद्दा नसल्याने दिल्लीत भाजपसाठी विजयाचा मार्ग खूप कठीण होता. मात्र, काँग्रेस आणि आपमधील विजोड युतीमुळे भाजपला दिल्लीत नवसंजीवनी मिळाली आहे. काँग्रेसच्या मंचावर केजरीवाल दिसत नाहीत, तर आपची दिल्लीत ‘एकला चलो’च्या धर्तीवर प्रचार मोहीम सुरू आहे.
मालीवाल प्रकरणाने दुरावा वाढलादोन्ही पक्षांमध्ये ऐक्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, केजरीवाल यांच्या घरी स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने दोन्ही पक्षांमध्ये दुरावा आणखी वाढला आहे.
दिल्लीत निवडणूक प्रचाराचे शेवटचे तीन दिवस उरले आहेत. भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा दिल्लीत विविध भागांत निवडणूक सभा घेत आहेत.
काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांना जोरदार मागणी आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवालही आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दररोज प्रचार करीत आहेत.
केजरीवाल यांनी काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यासाठीही निवडणूक सभा घेण्याची घोषणा केली आहे. परंतु कोणत्याही मोठ्या काँग्रेस नेत्यासोबत त्यांची निवडणूक सभा प्रस्तावित नाही.