यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा झाली आहे. येत्या ३१ जानेवारीपासून बजेट सेशन सुरु होणार आहे. हे अधिवेशन दोन भागांत ८ एप्रिल २०२२ पर्यंत चालणार आहे.
पहिल्या भागात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन असेल, दुसरा भाग हा १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असणार आहे. येत्या १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प संसदेसमोर मांडण्यात येणार आहे.
लोकसभा अध्यक्षांनी देशात कोविड-19 संसर्गाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता संसद भवनमध्ये आरोग्याशी संबंधित पावले आणि इतर तयारींचा आढावा घेतला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी रविवारी अधिकाऱ्यांना कोविडची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे याबाबत साशंकता निर्माण झाली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वी संसद भवनाची पाहणी केली होती. संसदेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून अनेक नेत्यांनाही यावेळी कोरोनाची लागण झाली आहे.