नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी मागील काही दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या घोषणा करत आहेत. यातच आता सोमवारीही त्यांनी अजून एक घोषणा केली आहे. यूपीमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास 10 लाखांपर्यंतचे उपचार मोफत होतील, अशी घोषणा प्रियंका गांधींनी केली आहे.
प्रियंका गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "कोरोना काळात आणि आता राज्यात पसरलेल्या तापेवरुन उत्तर प्रदेश सरकारचे राज्याकडे दुर्लक्ष असल्याचे जाणवतं आहे. आरोग्य व्यवस्थाही पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पण, आता स्वस्त आणि चांगल्या उपचारासाठी जाहीरनामा समितीच्या संमतीने, यूपी काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर कोणता 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत होईल.''
युवा-शेतकऱ्यांसाठी काँग्रेसची घोषणा
यापूर्वी प्रियंका गांधी यांनी शनिवारी बाराबंकी येथे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची आणि 20 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या, काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, गहू प्रति क्विंटल 2500 रुपयांना खरेदी केले जाईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या पिकाची किंमत 400 रुपये दराने मिळेल.
महिलांसाठी महत्वाची घोषणाप्रियंका यांनी उत्तर प्रदेशातील महिलांसाठीही मोठी घोषणा केली. काँग्रेस निवडणुकीत 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर 12वी पास मुलींना स्मार्टफोन आणि पदवी उत्तीर्ण तरुणींना इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल, अशी घोषणा काँग्रेसने केली.