ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20- जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे त्याआधी लोकांपर्यंत जीएसटी नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय या सगळ्या गोष्टी पोहचविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे. यासाठी खास तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन जीएसटीचं महत्त्व सांगत आहेत तसंच जीएसटीचं महत्त्व सांगताना ते भारताच्या तिरंग्याचा दाखला देत आहेत. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे. येत्या १ जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल. याआधी जीएसटीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची निवड करण्यात आली होती
अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून विविध सामाजिक संदेश नेहमीच देत असतात. नो स्मोकिंगच्या कॅम्पेनपासून ते व्यायामापर्यंतचे प्रत्येक सल्ले ते नेहमीच त्याच्या चाहत्यांना देत असतात. लवकरच ते ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमातून एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत आमिर खान आणि दंगल फेम फातिमा सना शेखही विशेष भूमिकेत आहेत. तसंच अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ती एका नर्तिकेची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरने सिनेमाबद्दल उत्सुकता आणखी वाढविली आहे.
GST - An initiative to create a unified national market. #OneNationOneTaxOneMarketpic.twitter.com/Cti76a8KUF— Ministry of Finance (@FinMinIndia) June 19, 2017