ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - कोलकातामधील ईडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या मॅचपूर्वी अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले होते. यानंतर सोशल मिडियात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, राष्ट्रगीतासाठी एक पैसाही घेतला नसल्याचं स्पष्टीकरण अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या टी-२० मॅचपूर्वी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी चार कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा सोशल मिडियात सुरु होत्या. पण हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानेही अमिताभ बच्चन यांची पाठराखण केली आहे. अमिताभ यांनी अशा प्रकारचं कोणतही मानधन घेतलं नव्हत असं स्पष्टीकरण बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली याने दिलं आहे.
एवढेच नाही तर, अमिताभ यांनी कोलकात्यात येण्यासाठीही स्वतःच्या खिशातून चार्टर्ड प्लेनचं भाडं भरलं. तसेच कोलकात्यात त्यांच्यासाठी हॉटेलचीही व्यवस्था केली होती. पण त्या सगळ्या खर्चाला फाटा देत अमिताभ हे थेट मैदानावर आले असेही गांगुली म्हणाला.