ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी धर्मांतराची मोहीम सुरु ठेवल्याने गोत्यात आलेल्या मोदी सरकारच्या मदतीला बिग बी अमिताभ बच्चन धावून आले आहेत. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश अमिताभ बच्चन मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.
हिंदूत्ववादी संघटनांनी देशभरात घर वापसीची मोहीम राबवली असून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी धर्मांतरावरुन मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती. हिंदूत्ववादी नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांनी मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली होती. घर वापसीमुळे मुस्लिम, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजामध्ये मोदी सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे विकासाऐवजी जातीयवादामुळे केंद्र सरकार जास्त चर्चेत राहिले. भविष्यात याचा फटका बसू नये आणि अल्पसंख्यांक समाजाचा विश्वास संपादन करता यावा यासाठी नरेंद्र मोदी सरसावले आहे. यासाठी मोदींनी अमिताभ बच्चन यांची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अमिताभ बच्चन केंद्र सरकारसाठी एक जाहिरात करणार असून या जाहिरातीमध्ये जात आणि धर्मापेक्षा विकास महत्त्वाचा आहे असा संदेश दिला जाणार आहे. ही जाहिरात प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर सर्वत्र झळकेल यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत.
एकीकडे पडद्यावर अमिताभ बच्चन मोदी सरकारची बाजू सांभाळणार असून दुसरीकडे पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी हे मैदानात उतरुन अल्पसंख्याकांशी थेट संवाद साधतील. नकवी देशभरातील अल्पसंख्यांक समाजाचे वर्चस्व असलेल्या भागांचा दौरा करतील. याचा शुभारंभ २ - ३ जानेवारीपासून नकवींच्या केरळ दौ-यापासून होणार आहे. केरळमध्ये ख्रिश्चन समाजाची संख्या जास्त आहे. मोदी सरकारविरोधात अल्पसंख्यांक समाजामध्ये गैरसमज पसरवण्यात आले असून हा गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न करीन असे नकवींनी म्हटले आहे.