नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी कृषी आंदोलनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (भानू) ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनातून माघार घेणाऱ्या दोन्ही संघटना ह्या उत्तर प्रदेशमधील आहेत.व्ही.एम. सिंग यांनी सांगितले की, हमीभाव मिळाल्यास आम्ही निघून जाऊ. आम्ही येथे लोकांना मारहाण करण्यास आलो नव्हतो. मात्र लाल किल्ल्याची तिरंग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाचीही होती, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच व्ही. एम. सिंह यांनी काल झालेल्या हिंसाचारावरून राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र व्ही.एम. सिंग हे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात नव्हते, अशीही माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काल या कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच या हिंसाचारात तिनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. तर लाल किल्ल्यावरही धार्मिक ध्वज फडकवला गेल्याने खळबळ उडाली होती.