लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सर्वच राजकीय पक्षांमध्या आयाराम, गयारामांची ये जा सुरू झाली आहे. याचदरम्यान, उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये बसपाला मोठा धक्का बसला आहे. पूर्वांचलच्या राजकारणातील ब्राह्मण चेहरा म्हणून ओखळ असलेल्या हरिशंकर तिवारी यांचे कुटुंब आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. हरिशंकर तिवारी यांचे दोन्ही पुत्र विनय शंकर आणि कुशल तिवारी हे लखनौमध्ये दाखल झाले आहेत. त्याशिवाय संत कबीरनगर-खलिलाबाद येथील भाजपा आमदार दिग्विजय नारायण चौबे ऊर्फ जय चौबे, करनैलगंज येथून भाजपा उमेदवार असलेले संतोष तिवारी, विधान परिषदेचे माजी सभापती गणेश शंकर पांडे आणि कुशीनगर येथील भाजपा खासदारांचे पुतणे हेसुद्धा आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
गोरखपूरच्या शेजारी असलेल्या बस्ती परिसरात मतांचे समिकरण बांधण्यासाठी आणि भाजपाला धक्का देण्यासाठी दिग्विजय नारायण चौबे यांना सपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तर हरिशंकत तिवारी यांचा धाकटा मुलगा आमदारा विनयशंकर तिवारी, मोठा मुलगा आणि माजी खासदार कुशल तिवारी आणि भाचा गणेशशंकर पांडे आज समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहे. ब्राह्मण विरुद्ध ठाकूर राजकारणामध्ये हरिशंकर तिवारी यांचे कुटुंब समाजवादी पक्षात दाखल झाल्याने पूर्वांचलमधील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. हा भाग ब्राह्मण बहुल असून, हरिशंकर तिवारी पूर्वांचलमधील सर्वात मोठा ब्राह्मण चेहरा आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर आणि ब्राह्मणांमध्ये वर्चस्वाची लढाई ही गोरखपूरमधूनच सुरू झाली होती. वीरेंद्र शाही आणि हरिशंकर तिवारी यांच्यादरम्यानच्या लढाईमुळे पूर्वांचलच्या राजकारणामध्ये दबंग नेत्यांसाठी दरवाजे उघडले होते. हरिशंकत तिवारी चिल्लूपार विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिले आहेत. मात्र २००७ मध्ये येथे त्यांचा पराभव झाला होता. हरिशंकर तिवारी कल्याण सिंह, राजनाथ सिंह आणि मुलायम सिंह यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले होते. या ब्राह्मण कुटुंबाचा समाजवादी पक्षामधील प्रवेश हा बसपासाठी धक्का आहेच, सोबतच भाजपासाठीही मोठे आव्हान आहे. कारण ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा योगी सरकारमध्ये तापलेला आहे.