गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका माजी मुख्यमंत्र्याने पक्ष सोडला, भाजपमध्ये जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 07:47 PM2021-12-07T19:47:59+5:302021-12-07T19:49:47+5:30
काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता गोवा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ फक्त तीनवर आले आहे.
गोवा: मागील काही महिन्यांपासून गोव्यात काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी काँग्रसमधून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर आता आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक(ravi naik) यांनी मंगळवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रवी नायक पोंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रवी नाईक यांनी आज गोवा विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 37 आमदार राहिले आहेत. तर काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आले आहे. दरम्यान, रवी नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रसने गोवा विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
पक्षाच्या कामगिरीवर टीका
पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर फेलेरो यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकले नाही, याला दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तसेच, फेलेरोंनी पत्रात गोवा काँग्रेसच्या अनेक बाबी उघड केल्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह समोर आला होता.