लखनौ - नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेली मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रायबरेलीमधील रायबरेली सदर मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर महिला आमदार अदिती सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या भाजपाच्या निकट होत्या. दरम्यान, आज त्यांनी औपचारिकरीत्या भाजपामध्ये प्रवेश केला. अदिती सिंह यांच्याबरोबरच आझमगडमधील सगडी विधानसभा मतदारसंघातील आमदार वंदना सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंहसुद्धा उपस्थित होते.
अदिती सिंह रायबरेली सदर मतदारसंघातून २०१७ मध्ये पहिल्यांदा आमदार बनल्या होत्या. मात्र त्यांची मोठी ओळख ही अखिलेश सिंह यांची कन्या म्हणून आहे. अखिलेश सिंह हे या मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिले होते. काही काळापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अदिती सिंह ह्या भाजपाच्या अधिक जवळ आल्या.
उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा तेव्हा अदिती सिंह यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले होते. दरम्यान, त्यांचे सदस्यत्व संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते.
रायबरेली हा भाग भाजपासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरला आहे. त्यातही रायबरेली सदर मतदारसंघात भाजपाचा एकदाही विजय झालेला नाही. मात्र आता येथे अदिती सिंहच्या रूपात भाजपाला एक मोठा चेहरा मिळाला आहे. हल्लीच अदिती सिंह यांनी कृषी कायद्यांवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती.